Saturday, November 16, 2013

Sai Complete Story

सई

"शामला ए शामला चहा आणतेस का एक कप", मी.
"हो आणते थांबा", शामला.
शामला चहा घेऊन आली, मी आणि माझा मुलगा यश निवांत गप्पा मारत बसलो होतो.
"काय मग, काय प्रोग्राम आहे आज तुमचा", शामला.
"आज आम्ही दोघ मस्त गप्पा मारत बसणार आहोत", यश.
"ठीक आहे तुम्ही गप्पा मारत बसा मी जेवणाची तयारी करते", शामला.
"तर यश तुला मी आज माझी एक गोष्ट सांगतो, माझी म्हणण्या पेक्षा सई ची", मी.
"सई कोण", यश.
"ऐक", असे म्हणून मी माझ्या आयुष्याच एक पर्व  त्याच्यापुढे उलगडू लागलो.

        तिला मी रोज येता जाता बघायचो. तिच्या नकळत तर कधी थेट तिच्या नजरेस नजर भिडवून. कधी कधी असेच तिच्या नकळत तिला पाहत बसायचो, तिच्या हालचाली, तिचा हसरा चेहरा, तिचे बोलके डोळे, कमरेपर्यंत झुलणारे तिचे केस. तसा मी फार श्रद्धाळू किव्वा देवदेव करणारा माणूस नाही, पण तिचे दर्शन व्हावे म्हणून मी न चुकता नेहमी एक दोन दिवसांच्या फरकाने साई मंदिरात जात असे. ती तर रोजच तिथे असायची, हार-फुलांचे दुकान होते तिचे. कोण जाने पण साईबाबा समोर उभा राहून प्रार्थना अगदी मनापासून करू लागलो, इतकी आंतरिक प्रार्थना मी कधीच कुणाकडे केली नाही. मनापासून तिची ओढ मला लागली होती 'सईची', हि त्या माझ्या सईची गोष्ट.
        त्या दिवशी माझे ऑफिस मधले काम लवकर संपले, साहेब सुधा आठवडा भराच्या सुट्टीवर गेले होते त्यामुळे सर्व काही निवांत होत. मी ब्याग घेतली आणि घरी जाण्यास निघालो. सायंकाळचे चार वाजले असतील. तसे माझे घर आणि ऑफिस यातील अंतर काही फार नव्हते, बसने तर मी अगदी दहा ते पंधरा मिनिटात पोहचत असे म्हणून आज मी पायीच घरी जाऊ लागलो. पाच मिनिट चालून गेल्यावर रस्त्याच्या डाव्या अंगाला एक मंदिर दिसले. रस्त्याच्या कडेने घर-वस्ती होती त्या वस्तीच्या आतील बाजूस ते मंदिर दिसत होते. थोडी पावलं चालून गेल्यावर डाव्या हाताला एक चिंचोळा रस्ता जाताना दिसला, हा रस्ता मंदिराकडे जात असावा असा अंदाज बांधला आणि त्या वाटेने मी चालू लागलो काही अंतर चालून गेल्यावर ते मंदिर दिसू लागले. मंदिर बरेच मोठे होते. आजू बाजूचा परिसर अगदी स्वच आणि प्रसन्न दिसत होता. मंदिराकडे घेऊन जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा  हार-फुलांची दुकान होती. तसा मी फार धार्मिक हि नाही आणि पूर्णपणे नास्तिक हि नाही, पण स्वताहून मी कधीच हार फुलांची ताटे देवाला वाहिली नव्हती. साई बाबांचे मंदिर होते ते. दुरूनच रस्त्या वरूनही अगदी मंदिराच्या मध्यभागी असलेली साई ची मूर्ती दिसत होती. तसेच साई मंदिराच्या आसपास चार इतर देव-देवतांची हि मंदिरे दिसत होती. मंदिराच्या वाटेवरून चालताना हार-फुल वाले हार-फुलांची ताटे घेण्यास विनवणी करीत होते पण मी फारसे  त्याकडे लक्ष दिले नाही आणि पुढे चालत राहिलो. मंदिर जवळ येताच एका मुलीचा आवाज माज्या कानावर पडला. 'साहेब'... मी बाजूला वळून पहिले. पाहताक्षणीच तिची प्रतिमा अगदी हृदयावर छापली गेली. ती सांगत होती "साहेब आपण नातलगांकडे जाताना काही न काही घेऊन जातोच आणि हे तर आपले देव दैवत, ते काही मागत नाहीत पण आपल्या मनशांती साठी हे वाहय्लाच लागत". ती बोलत होती आणि मी जणू तिचे बोलणे हृदयात साठवून घेत होतो. असे काय होते तीझ्यात कि मी तिला पाहताक्षणीच इतका भारावून गेलो. मी नकळत तिच्या समोर जाऊन उभा राहिलो हार-फुलांचे ताट घेतले आणि साई मंदिरात प्रवेश केला. मंदिरात येताच इतके प्रसन्न मला पूर्वी कधीच वाटले नव्हते. मी हार फुले साईबाबाला वाहिली. मन अगदी शांत आणि प्रसन्न होते, काय मागावे देवाकडे का नुसतीच सुखाची  प्रार्थना करावी काहीच सुचले नाही पण मन अगदी आकाशात उडत होते.
          मी घरी आलो अगदी प्रसन्न चेहऱ्याने. आईला मला पाहून खूप बर वाटलं, "काय रे आज पगार वाढीची बातमी घेऊन आला आहेस काय? खूप आनंदात दिसतोयस", आई म्हणाली.
        मी माझ्या चेहऱ्यावरचे हर्ष भाव लपवित तिला म्हणालो "नाही ग आज काही काम नव्हतं आणि ऑफिस मधून हि लवकर निघालो, म्हणून जरा... यु नो", मी म्हणालो.
"ओके बेटा, चल फ्रेश हो आणि चहा घे." आई म्हणाली आणि मी पटकन बाथरूम मध्ये धूम ठोकली.
 दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये माझ कामात लक्षच लागेना. तसही फारस काम असं नव्हतच. दिवस भर माझ्या डोळ्यासमोर तिचा चेहरा तरळत राहिला. कधी संध्याकाळ होते आणि कधी मी साई मंदिरात  जातोय असं वाटत होत. पण त्या दिवशी लवकर निघता येणार नव्हत, पाच वाजताच निघावं लागणार होत. दिवस कसाबसा निघून गेला आणि एकदाचा मी ऑफिस मधून निघालो. बसची वाट न पाहता मी सरळ पाई निघालो. भरभर पाय चालवीत मी साई मंदिराच्या दिशेने निघालो. काही वेळातच मला तिचे दुकान दिसू लागले.  माझे डोळे तिलाच शोधत होते, मी दुकानाच्या जवळ पोहोचलो. पण आज ती तिथे नव्हतीच, तिथे कोणी एक वयोवृद्ध माणूस बसले होते. माझी नजर तिला शोधत भिरभिरत होती, ती कुठे दिसत नाही हे पाहून मला खूप अस्वस्थ वाटू लागले. 
"हार घेता काय साहेब"
"अ .... हो पाहिजेत", मी.
ते हार फुले बांधत असताना मी धीर करून विचारले, "इथे एक मुलगी असायची न...".
"हो, ती माझी मुलगी, सई नाव तीच, आज जरा तब्येत ठीक नाही तिची".
मी जरा अस्वस्थ होऊनच विचारला "काय झालं"?
"काही नाही जरा ताप आहे".
 मी हार फुले देवळात वाहिली आणि थोडा निराश आणि पडलेल्या चेहऱ्याने घरी आलो. आई समोर माझी अस्वस्थता लपू नाही शकली. 
"काय रे काय झालं, काही प्रोब्लेम आहे का, असा का चेहरा पडलायस", आई. 
"काही नाही ग आई, आज खूप काम होत आणि नीटस पूर्ण पण झालं नाही, म्हणून जरा...", मी अर्धवट काहीतरी बोलून आतमध्ये गेलो.
हे मला काय होतंय, त्या दिवशी मी नीटसा जेवलो हि नाही. मला ती आवडू लागली होती, पण तिचे विचार मला इतके अस्वस्थ का करत होते. मी प्रेमात पडत चाललोय का? छे प्रेम आणि पाहताक्षणी, अशक्य, माझा नाही विश्वास. कदाचित हे फक्त आकर्षण असेल. मग तिचे विचार इतके अस्वस्थ का करतील. काही कळत नाही आता. असं काहीसा वेड्यासारखा विचार करत मी झोपी गेलो.
  दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये फार विचार केला आणि ठरवलं कि आज तिकडे जायचं नाही. संध्याकाळ झाली, मी नेहमीप्रमाणे सर्व काम लवकर आटोपून पाच वाजता घरी जाण्यास निघालो. बस थांब्यावर येऊन बसलो. बस यायला अजून १० ते १५ मिनिटे होती. मी काही वेळ तसाच बसून राहिलो. माहित नाही पण अचानक मला तिची ओढ परत अस्वस्थ करू लागली. असं वाटू लागले कि आताच तिकडे जावे आणि सई ला भेटावे. माझ एक मन सारख विनवण्या करीत होत, चल मी नाही राहू शकणार तिला पाहिल्याशिवाय. मी पाच मिनिटातच उठलो आणि पाई चालत जाऊ लागलो. एक आंतरिक ओढ मला तिकडे खेचून नेत होती जणू.   
  मी मंदिराच्या दिशेने निघालो, आणि तिथूनच मनापासून प्रार्थना करू लागलो कि आज सई असुदे, आज तरी मला तिला पाहायचा आहे. काही वेळातच मी तिच्या दुकानासमोर जाऊन उभा राहिलो. ती होती आज तिथे, तिला पाहून आज मला कोण आनंद झालं होता. पण काहीसा स्वतःला सावरत मी थोडा पुढे सरकलो.
" हार फुलांच ताट देता का", मी.
तिने माझ्याकडे पहिले आणि एक विलक्षण स्मितहास्य करीत ती म्हणाली, "काय साहेब आज स्वताहून आलात हार घ्यायला".
"हो त्या दिवशी मला तुमच पटल, आपल्या मनशांती साठी तरी हार फुले वाहिलीच पाहिजेत", मी. 
तिने हार फुलांचे ताट माझ्याकडे दिले, "पैसे बाहेर आल्यावर दिले तरी चालतील.
     मी ताट घेतले आणि साई मंदिरात प्रवेश केला, आणि मनोभावे प्रार्थना केली. काही वेळाने मी ताट आणि पैसे देण्यासाठी सई कडे गेलो. ताट आणि पैसे देता देता मी तिला बोललो, "काल हि मी आलो होतो तुम्ही काल दिसला नाहीत"
"हो काल थोडा ताप आला होता म्हणून घरीच होते", सई.
"आता कशी आहे तब्येत, औषध घेतले", मी विचारले.
"आता ठीक आहे", सई मोजकच बोलायचा प्रयत्न करत होती.
"अं ..... ओके, चला येतो", मी. 
"अं....हो", सई.
मला आता खात्री पटत चालली होती कि मी सईच्या प्रेमात पडलोय. दुसऱ्या दिवशी रविवार होता म्हणून जरा रेंगाळतच जेवण वगैरे आटोपून झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी उशिरा उठलो. आईने नाश्ता तयार करून ठेवला होता. मी अंघोळ उरकून पटकन आलो. नाश्ता करता करता आई बोलली "आज कुठेतरी बाहेर जावस वाटतंय".
मी काहीसा विचार केला आणि बोललो, "तुला ते नाक्या जवळच साई बाबाच मंदिर माहित आहे का"?
"नाही रे, कधी गेलीच नाही तिकडे", आई.
"मग आपण एक काम करू, तिकडे जाऊ दर्शन करू आणि जेवायला बाहेरच जाऊया", मी.
"ठीक आहे", आई.
आम्ही तयारी आटोपून ९.३० च्या दरम्यान घरून निघालो. काही वेळातच आम्ही साई मंदिराच्या आवारात येऊन पोहोचलो. सई नेहमीप्रमाणे हार बनवण्यात गुंतली होती. आई हार फुले घेण्यासाठी दुसऱ्या एका दुकानात जाणार तेवढ्यात मी तिला थांबवले आणि सई च्या दुकानाकडे घेऊन गेलो.
आम्हाला पाहून सई ने एक गोड हास्य केल. 
"बस, आजचा दिवस सफल झाला", मी पुटपुटलो.
"काय म्हणालास", आई. 
"अं ... काही नाही आई, तू हार घे आपण जाऊ मग आत", मी.
आईने हार फुले घेतली, मी सई कडेच पाहत बसलो होतो पण सईने फारसे माझ्याकडे बघितलेच नाही. मी आणि आई ने साई दर्शन घेतले आणि निघालो. जाता जाता सई कडे नजर टाकली. सई ने यावेळेस झिर्झीरत्या नजरेने माझ्याकडे पहिले, मी स्मितहास्य केले तसे तिनेही केले. माझ्या मनात आनंदाचे कारंजे उसळत होते. मला कळून चुकलं होत कि मी सईच्या प्रेमात पडत चाललो आहे. तो दिवस खूप चांगला गेला.
 दुसर्या दिवशी ऑफिस मध्ये खूप काम होते, साहेब सुधा सुट्टीवरून नुकतेच कामावर रुजू झाले होते आणि त्यांचे सुधा भरपूर काम बाकी होते. संध्याकाळी पाच वाजल्यानंतर माझे मन थोडे अस्वस्थ झाले. साहेब काही खुर्ची वरून उठायचे नाव काढत नव्हते. आणि एक एक करून काम काढताच होते. पाच चे सहा, सहा चे सात वाजले. त्यानंतर साहेब काम संपवून उठले आणि माझा जीव भांड्यात पडला.
"समीर आजच काम पुरे, बाकीच उद्या बघू", साहेब.
"ठीक आहे", मी म्हटलो आणि निघायची तयारी सुरु केली. 
ऑफिस मधून  निघेपर्यंत सव्वा सात वाजले, मी फार गडबड करतोय हे पाहून साहेब म्हणाले "समीर फार गडबडीत दिसतोयस, कुठे जायचं आहे का, मी सोडू का गाडीने". "अं ... नाही सर, काही मेजर नाही मी जाईन", मी म्हणालो आणि ब्याग घेऊन भरभर ऑफिस मधून बाहेर पडलो. झटपट पाऊल टाकीत मी मंदिराच्या दिशेने निघालो साडे सात वाजत आले होते, सई असेल कि नाही या विचाराने मी अस्वस्थ होत होतो. काही वेळातच मी मंदिराच्या आवारात पोहोचलो. आज फारशी गर्दी नव्हती, मी सई च्या दुकानाकडे पहिले, 'माझ नशीब चांगलं आहे', मी मनातल्या मनात म्हणालो आणि दुकानात शिरलो
"काय साहेब, ऑफिस वरून आलेले दिसता", सई.
"हो आज इकडे यावस वाटल", मी.
"तसा आधी मी इकडे कधी यायचो नाही, पण हल्ली इकडे नेहमी यावस वाटत.", मी.
"आहेच इथला परिसर प्रसन्न एवढा, माणूस आलाच पाहिजे इकडे", सई.
"तुला कळल नाही", मी.
माझ्या नकळत आज ओठातून शब्द बाहेर पडत होते, जणू भावना आता शब्द रूपाने बाहेर ओसंडू पाहत होत्या. 
"सई, मला तुला काही विचारायचे आहे", मी.
"विचाराना", सई.
"सई हल्ली मी इकडे रोज येण्याच कारण म्हणजे, मी तुज्या प्रेमात पडलोय", मी धीर एकवटून एकदाच सई ला माझ्या तीझ्याबद्दल च्या भावना बोलून दाखवल्या.
सई मान खाली घालून बसली होती, तिच्या आजूबाजूला पिवळ्या लाल झेंडू च्या फुलांचा घेराव होता, त्यात ती जणू एका परीसारखी भासत होती. 
"सई मला कळतंय हे सर्व तुझ्यासाठी अनपेक्षित आहे, पण मला माझ्या भावना आता जास्त दिवस दाबून ठेवता येणार नाहीत, माझ मन मला तुझ्याकडे मोकळ करायचं होत, माझी तुला अजून ओळखायची इच्छा आहे, तुझ्याशी खूप बोलायचे आहे पण इथे नाही दुसरी कडे कुठे तरी, येशील तू?", मी.
सई एका फुलावरती नजर टिकवून बसली होती ती काहीच बोलत नव्हती, माझ्या मनाची घालमेल वाढत चालली होती. 
"सई माझ्या बोलण्याचा तुला राग आला असेल कदाचित, पण तुला मी शब्द देतो कि तुझ्या मनात तस काही नसेल तर मी तुला त्रास नाही देणार", मी न राहवून सगळ बोलत होतो.
"मी समजू शकते, पण ....", सई.
तिने वाक्य अर्धवट तोडले आणि मझ्याकडे पाहत राहिली.
"पण काय सई, बोल मला अस झुरवत ठेऊ नकोस", मी.
"तुम्हाला माझ्याबद्दल काही माहित नाही, कदाचित मी तुमच्या लायक हि नाही...", सई.
"हे अस काही बोलू नकोस, माझ्या मनात आता तुझ्या शिवाय कोणाचाच विचार नसतो, हे बघ मला तुला उद्या भेटायचे आहे मी संध्याकाळी साडे पाच वाजता संभाजी बागेत येईन आणि माझी इच्छा आहे कि तुही यावस", मी बोललो आणि निघू लागलो सई माझ्याकडे विलक्षण भावाने पाहत होती तिच्या डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या वाटल्या आणि मी एक एक पाऊल मागे टाकीत तिथून निघून गेलो. 
दुसऱ्या दिवशी ऑफिस चे सर्व काम मी भरभर संपविले आणि पाच वाजता ऑफिस मधून निघालो. संभाजी बाग ऑफिस पासून काही अंतरावर होती, सई ला  सुधा फारसे लांब पडले नसते. मी सव्वा पाचच्या सुमारास बागेत येऊन पोहोचलो. तिकडच्या एका बाकड्यावर बसून मी सई येण्याची वात पाहत बसलो. माझा विश्वास होता कि सई नक्की येणार. साडे पाच वाजले, मी बागेच्या प्रवेश द्वाराकडे डोळे लाऊन बसलो होतो पण सई दिसत नव्हती. सहा वाजत आले होते पण सई कुठे दिसत नव्हती. मी अस्वस्थ होत होतो. पण मन तिथून हलण्यास परवानगी देत नव्हत. मी तिथेच बसून राहिलो तिची वाट पाहत. सात वाजत आले होते, सात चे साडे सात वाजले. आता माझ्या आशा मावळत चालल्या होत्या. मी तिथून उठलो आणि निराश होऊन घराकडे निघालो.  
आयुष्यात एवढा निराश मी कधीच झालो नव्हतो, त्या दिवशी मी जेवलो सुधा नाही. झोप सुधा लगेच लागत नव्हती, बिछान्यावर एका कुशी वरून दुसऱ्या कुशीवर होत राहिलो, मनार तिच्या विचारांचे काहूर माजलेले. 'असे कसे झाले?'
'सई आली का नसेल?'
'तीच माझ्यावर प्रेम नाही का?'
...
अस कस होईल मी पाहिलंय तिच्या नजरेत, तीच सुधा माझ्यावर प्रेम आहे. त्याच नजरेने मला हिम्मत दिली माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी. मग ती आली का नाही मला भेटायला. विचार करता करताच कधी झोप लागली कळल नाही. 
दुसऱ्या दिवशी मी नेहमीप्रमाणे कामाला गेलो, कामात फारस लक्ष लागत नव्हते तरीही कसेबसे काम संपवले आणि पाच वाजता मी घरी जाण्यास निघालो. मी बस थांब्यावर येऊन उभा राहिलो. पाच मिनिटे मी शून्यात नजर लावून बसलो होतो तेव्हड्यात माझी बस कधी येऊन गेली ते मला कळलेच नाही. बस भरधाव माझ्यासमोरून निघून गेल्यावर मी भानावर आलो. 'मला अस निराश होऊन चालणार नाही, मी तिचा विचार आता सोडला पाहिजे, कदाचित तिच्या मनात दुसरा कोणी...', मी माझ्याशीच बोलत होतो.
मन काही केल्या स्थिर रहात नव्हत, मनात निराशा आणि प्रश्नाचे काहूर पेटले होते, स्थिर होती ती फक्त माझी नजर, कशावर ते मात्र माहित नाही जणू डोळ्यांनी साथ सोडली होती मनाची. माझी बस आता अर्ध्या तासानंतर येणार होती, तिथे थांबण्यापेक्षा मी चालत जाण्याचा निर्णय घेतला आणि मी चालत घरी निघालो. 
           हळू हळू एक एक पाऊल टाकीत मी रस्त्याने चाललो होतो इतक्यात मागून कोणीतरी आवाज दिला. 
"समीर"
मी मागे वळून पहिले ती सई होती, खरच होती का ती का हा फक्त भास किव्वा मनाचे खेळ, क्षणभर काहीच कळले नाही.
मी फक्त सई कडे पाहत होतो, तिच्या डोळ्यात, खोलवर.
"समीर मी सई", सई.
मी भानावर आलो, तिला पाहून खूप आनंद झाला होता इतका कि मी तो शब्दात मांडू शकत नाही, आणि दुसर्या क्षणी एक प्रचंड आघात झाला, बराच काळ अगदी निशब्द गेला.
"हो समीर, कदाचित तुम्हाला आता कळलेच असेल कि मी तेव्हा तुम्हाला भेटायला का आले नाही", सई.
"जन्म हा असाच गेला, माझ्यावर तुमच्या सारखा कोणी प्रेम करेल अस कधीच वाटल नव्हत आणि लग्न तर दूरचीच गोष्ट", सई बोलत होती.
"माझ्या जन्मानंतर काही दिवसातच आई वारली, लहानपणा पासून माझा सांभाळ माझ्या वडिलांनी केला. मोठ्या काकाने मला अनेक दुषणे लावीत माझ्यासहित वडिलांनाहि घराबाहेत काढले. एक वर्षाची असेन तेव्हा वडील मला घेऊन या शहरात आले. छोटी मोठी काम करून वडिलांनी माझा सांभाळ केला. आता उरलेलं आयुष्य हि आहे असच ओढत काढायचं... किव्वा त्या पलीकडे कधी विचारच केला नाही..."
"तुमच प्रेम मिळाव एवढी मी भाग्यवान नाही समीर", सईच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते , ती मागे वळली आणि जाऊ लागली.
मी तिच्या पाठमोऱ्या आकृती कडे पाहत राहिलो, तिला मी पूर्वी असे कधीच पाहिले नव्हते, सई हळू हळू चालत निघाली होती एका कुबडीच्या सहाय्याने.... हो तीचा एक पाय अधू होता. 
            आता मन अगदी स्थिर झालं होत, माझी रोजची दिनचर्या नेहमीप्रमाणे चालू झाली होती. मनात कसल्याच शंका किव्वा प्रश्न राहिले नव्हते. मी पुन्हा माझं पूर्वीच सुखी आयुष्य जगू लागलो होतो. मनावरच एक मळभ, एक ओझ कमी झाल होत. 
            "तर यश बेटा हि आहे माझ्या सईची गोष्ट", मी.
            "बाबा....", यश अगदी निशब्द झाला, त्याचे डोळे भरून आले.
             "आई... आई...", यश धावत स्वयंपाक घरात गेला आणि आई समोर उभा राहिला.
             "काय रे यश काय झाल", आई.
             "आई लग्नापूर्वी तुझं नाव सई होत.", यश. 
             सईने  प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरविला.